मुंबई (वृत्तसंस्था ) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी अटक केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ईडीने भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी खडसे यांनाही समन्स पाठवले आहेत. ईडीने पाठवलेल्या नोटीसनुसार खडसे यांना उद्या म्हणजेच गुरुवारी (८ जुलै) सकाळी ११वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे
विशेष म्हणजे या प्रकरणाची कारवाई थांबवण्यासाठी एकनाथ खडसे हायकोर्टात गेले आहेत. हायकोर्टाने ईडीला सुनावणी सुरु असेपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. पण चौकशीबाबत अद्याप कोणतेही आदेश दिलेले नाहीत. कोर्टाचे आदेश असल्याने एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई होणार नाही. मात्र, त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे
ईडीची सिडी लावण्याचा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याआधी, भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती. दुसरीकडे, “भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा तपास हा योग्य दिशेने सुरु आहे. गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर आता स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता आहे” असं मत अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे खडसेंचं टेंशन वाढण्याची शक्यता आहे.