शिवसेना ठाकरे गटाचे विभाग नियंत्रकांना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथील नोकरदारांसाठी, विद्यार्थ्यांसाठी सकाळी ७ ते १० च्या दरम्यान एसटी महामंडळाच्या विशेष बस सेवा सुरू कराव्यात. या संदर्भात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांना शिवसेना ठाकरे गटातर्फे निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन विभाग नियंत्रकांनी दिले आहे.
तालुक्यातील शिरसोली, भोकर येथील विद्यार्थी तसेच नोकरवर्ग जळगाव येथे जाण्यासाठी सकाळी ७ ते ९.३० दरम्यान तत्पर असतात. मात्र त्यांना जाण्यासाठी वाहतुकीची साधने म्हणून एसटी महामंडळची बस मिळत नाही. त्यामुळे सकाळी ७ ते १० दरम्यान नियमित बस सेवा सुरू झाली पाहिजे. तसेच सकाळी जळगाव येथून सव्वा सात वाजता आणि संध्याकाळी ५ वाजता भोकरला जाण्यासाठी नियमित बस सुरू करावी, असे निवेदनात म्हटले आहे. बस सेवा नसल्यामुळे पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
निवेदनावर शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख उमेश पाटील, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, संतोष माळी, माजी सरपंच प्रवीण बारी आदींच्या सह्या आहेत.