पदार्थ नव्हे तर पदार्थाच्या आसक्तीला सोडायला हवे. आसक्ती असेल तर मुक्ती होऊ शकत नाही. अनासक्ती मुक्तीचे द्वार आहे, आसक्ती सोडायची असेल तर भित्रेपणा चालत नाही. जे लोक भित्रे असतात तेच आसक्त असतात. तुम्ही जर आसक्तीने, ममत्वाने जखडले गेले तर मुक्ती होणे केवळ अशक्य त्यामुळे आपण अनासक्त कसे होऊ शकतो याबाबत चिंतन करून तसे आचरण करायला हवे असे विचार शासन दीपक परमपुज्य सुमित मुनिजी महाराज साहेब यांनी व्यक्त केले.
उत्तराध्यायन सुत्राच्या १६ व्या अध्यायाची गाथेचा आधार विवेचनासाठी घेतला. सिमेंटमध्ये पाणी मिसळले की ते जसे कुठेही चिकटते, त्याच प्रमाणे आसक्तीचे म्हणायला हवे. आसक्ती कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकते याबाबत गुरु शिष्याचे उदाहरण त्यांनी दिले. गोचरीच्यावेळी साधी मुपत्ती मिळाली, ती गुरुंनी ठेऊन घेतली परंतु त्या शिष्याला उठता बसता, सतत घोकणी त्या मुपत्तीचीच लागलेली असे. ही आसक्ती इतकी वाढली की, शिष्याने प्रतिक्रमणाच्या अंधाराच्या वेळी गुरुंचा गळा आवळला, गुरुंनी देखील प्रतिकार म्हणून शिष्याचा गळा आवळला त्यात दोहोंचा मृत्यू झाला व आसक्तीमुळे नरकगतीस प्राप्त झाले. केवळ क्षुल्लक मुपत्तीबाबत शिष्याने आसक्ती धरली तर त्याचा मोठा अनर्थ घडला. एखादी व्यक्ती वस्तुंचा संग्रह करते त्याचे कारण आसक्तीच असते. आसक्ती किंवा स्वामीत्व आले की दुःख प्राप्त झालेच म्हणून समजा. आसक्ती भित्र्या लोकांमध्येच निर्माण होत असते त्यामुळे आसक्ती सोडण्याचे धाडस करून मुक्तता मिळविण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत असे आवाहन ही करण्यात आले.
आरंभी परमपुज्य ऋजुप्रज्ञ मुनिजी मराहाज साहेब यांनी वाद विवाद किंवा भांडणे होण्याची कारणे यावर सविस्तर चर्चा केली. एखादी सुंदर व्यक्ती बाह्य दिसण्यातून चांगली अथवा वाईट समजू शकत नाही परंतु त्याने वाणीतून उच्चारलेले शब्द त्याची खरी ओळख देत असतात. प्रत्येकाचा व्यवहार व वाणी उत्तमच असण्याकडे कटाक्ष असावा. आगमामध्ये स्त्री, पुरुष, पत्नी, मुलं, नोकर यांच्याशी कसे बोलावे याबाबत शिकविलेले आहे ते आगम वाचनातून देखील शिकता येईल त्यामुळे आगम वाचन करावे असे आवाहन महाराज साहेबांनी केले.