किल्ल्याचे संवर्धन करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी
जळगाव;- महाराष्ट्रातील गड-किल्ले हे आपल्या पूर्वजांच्या अतुलनीय पराक्रमाचा वारसा लाभलेले आहेत. जळगाव जिल्ह्यात पारोळा येथील पेशवेकालीन भुईकोट किल्ला हा असाच एक ऐतिहासिक आहे; मात्र किल्ल्याची झालेली पडझड, भग्नावस्था, किल्ल्याचा शौचालय/मुतारी म्हणून वापर, आवारातील कचरा आणि घाणीचे साम्राज्य अशी अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. कोणीही देखरेख करणारा नसल्यामुळे या परिसरात मद्य पिणे, जुगार खेळणे ही सर्रास चालू असून आतमध्ये डुकरांचा वावरही मोठ्या प्रमाणात आहे. एकूणच पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा भुईकोट किल्ला अत्यंत दुरावस्थेत आहे. या किल्ल्याची त्वरीत डागडुजी करून किल्ल्याचे पावित्र्य रक्षण आणि संवर्धन करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. किल्ल्याची डागडुजी समयमर्यादा घालून पूर्ण करण्यात यावी,यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ आंदोलन करण्यात आले. तसेच या संदर्भातील समितीच्या वतीने एक निवेदन जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी, राज्य पुरातत्त्व खाते, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याचे समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी सांगितले.
देशभर आंदोलन : याविषयी स्थानिक प्रशासनाला निवेदन देणे, हातात हस्तफलक धरलेली छायाचित्रे, स्वत:ची चित्रीकरण केलेली प्रतिक्रिया (व्हिडिओ बाईट) तथा जनजागृतीपर संदेश सामाजिक प्रसारमाध्यमांवर पाठवणे अशा प्रकारे आंदोलन करण्यात आले. यात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, दिल्ली, आसाम, हरियाणा, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा, पश्चिम बंगाल, मेघालय या राज्यांतील दुर्ग आणि राष्ट्र प्रेमी नागरिक सहभागी झाले होते. या आंदोलनात हिंदु राष्ट्र सेना, झुंज प्रतिष्ठान पुणे, राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद भुसावळ, जळगाव जिल्हा दुर्ग संवर्धन,सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटना सहभागी झाल्या होत्या. हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीनेही जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात सहभागी
मोहन तिवारी, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख, हिंदू राष्ट्र सेना, जळगाव डॉ. अभय रावते, जळगाव जिल्हा दुर्गसंवर्धन अध्यक्ष, राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद, यावलजगन्नाथ बाविस्कर, माजी भाजप तालुकाप्रमुख, चोपडाशिशिर जावळे, माजी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद, भुसावलमहेंद्रसिंह राजपूत, करणी सेना, जळगाव यावल (जळगाव) येथील ‘एक दिवस महाराजांसाठी’ या संघटनेचे 36 कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने या ऑनलाइन आंदोलनात हातात फलक घेऊन सहभागी झाले होते.नासिक येथील ‘श्री राम खुर्दळ शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था’ यांसह अन्य दुर्गप्रेमींनी समितीला पाठिंबा दर्शवला.