अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांचे प्रतिपादन
“संसर्गजन्य रोग” विषयावर कार्यशाळेचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) :- स्वतःच्या व रुग्णांच्या आरोग्यमयी भविष्यासाठी डॉक्टरांनी कौशल्यपूर्ण असणे आवश्यक आहे. प्रत्येक जीव मूल्यवान आहे. त्यासाठी मानवी मूल्य महत्वाचे ठरतात. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासकाने तयार राहिले पाहिजे. विद्यार्थी स्वतः आत्मविश्वासाने कौशल्यपूर्ण, ज्ञानपूर्ण होऊन वैद्यकीय क्षेत्रात निपूण होऊ शकतो, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागात “संसर्गजन्य रोग” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून निरीक्षक डॉ. सुरेंद्र सुरवाडे, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे व डॉ. गजानन सुरेवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. विलास मालकर, कार्यशाळा आयोजक सचिव डॉ. किशोर इंगोले मंचावर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.