कोलकाता ( वृत्तसंस्था ) – पश्चिम बंगालमधील भोवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर, सर्वांच्या नजरा आज मतमोजणीकडे होत्या ममता बॅनर्जी यांनी या पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.
पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रीपद स्वतःकडे कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जींना हा विजय आवश्यक होता. कारण, मे महिन्यात नंदीग्राम मतदार संघात झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने एकहाती सत्ता आणलेली जरी असली, तरी देखील ममता बॅनर्जी या स्वतः निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत कायदेशीरदृष्ट्या निवडून येणं गरजेचं होतं. त्यामुळे या पोटनिवडणुकीला विशेष महत्व होते. भवानीपूर हा ममता बॅनर्जींचा पारिपारीक मतदारसंघ आहे.
तृणमूल नेत्यांनी शनिवारी रात्री दावा केला होता की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या ५०,००० पेक्षा जास्त मतांनी जिंकणार आहेत. हा दावा खरा ठरला. मार्च-एप्रिल विधानसभा निवडणुकीत भवानीपूरची जागा जिंकलेल्या शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्यापेक्षा जास्त फरकाने ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत.