जळगाव तालुक्यातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : मयत बहिण व भाऊ मालमत्तेला वारस असताना तलाठी व मंडळाधिकाऱ्यांना हाताशी धरुन एकटीच वारस असल्याचे खोटे कागदपत्र सादर करुन प्रौढाची व न्यायालयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
कमलाकर सिताराम भोळे (वय ५६,रा.असोदा, ता.जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. कमलाकर भोळे यांना अरुण भोळे हे भाऊ तर मिराबाई प्रेमराज पाटील (रा.रामेश्वर कॉलनी) व शकुंतला उर्फ रेखा पितांबर फिरके (रा.न्हावी, ता.यावल) या दोन बहिणी आहे. त्यापैकी बहिणी मिराबाई व भाऊ अरुण यांचे निधन झाले आहे. भोळे परिवाराची असोदा शिवारात गट नं.२६०६ मध्ये २६ आर तर २६०४ मध्ये १६ आर अशी शेतजमीन आहे.
रेखा फिरके यांनी ३ जानेवारी २०२२ ते ६ जानेवारी २०२३ या कालावधीत तलाठी व मंडळ अधिकारी यांना हाताशी धरुन या मालमत्तेला आपण एकटेच वारस असल्याचे दाखवून खोटे पुरावे न्यायालयात सादर केले. त्यानंतर ही शेती ध्रुव जयंत भोळे यांना परस्पर विक्री केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कमलाकर भोळे यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशाने बहिण शकुंतला फिरके यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर करीत आहेत.