जळगाव ( प्रतिनिधी ) – सुई धाग्यात ओवलेली असेल तर ती हव्या त्या वेळी बरोबर सापडते, इतरत्र गहाळ होत नाही. त्या प्रमाणेच ज्ञानयुक्त जीव संसारात कधीच भरकटत नाही. जीव ज्ञान आणि दर्शन यांनी युक्त असतो. फक्त सुईत ओवलेला धागा पांढरा की रंगीन? असा प्रश्न असतो तसाच जीवामध्ये असलेल्या ज्ञानाबाबत म्हणता येईल. बदाम खाल्याने अथवा शंखपुष्पी प्यायल्याने ज्ञान मिळत नाही ते प्रयत्नांनी मिळवावे लागते. आत्म्याच्या उद्धारासाठी ज्ञानवान बना असे आवाहन शासन दीपक परमपुज्य सुमित मुनीजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून केले.
माणूस मिथ्यत्व सोडत नाही. पुरुषाचे चार प्रकार सांगण्यात आले. काहीही ठाऊक नाही हे ठाऊक नसलेला, काही ठाऊक नाही पण आपल्याला काही ठाऊक नाही याची जाण असलेला, ज्याला ठाऊक आहे पण तो ते जाणत नाही असा आणि जो जाणतो हे त्याला ठाऊक आहे असा ज्ञानी व्यक्ती आपण चौथ्या प्रकारातील ज्ञानी व्यक्ती होऊ या. सगळे प्रश्न हे अज्ञानाच्या कारणामुळे उपस्थित होत असतात.त्यामुळे जीवनात भरकटायचे नसेल तर ज्ञान मिळवा असा महत्त्वाचा संदेश महाराज साहेबांनी दिला.
छिद्रान्वेषणवृत्ती कुवृत्ती असते. ही वृत्ती बाळगणे म्हणजे १८ पाप करण्यासारखे असते. सगळ्यांचे अवगुण बघत बघत हे अवगुण आपल्यात देखील येऊ शकतात त्यामुळे या वृत्तीपासून आपल्याला दूर ठेवले पाहिजे. दुसऱ्याची चूक चार चौघात न सांगता त्याला एकटा असताना सांगा. चार चौघात सांगितलेली चूक ही निंदा करण्यासाठी सांगितलेली असते असे परमपुज्य ऋजुप्रज्ञजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनात सांगितले.