चाळीसगाव शहरातील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- शहरातील राष्ट्रीय महाविद्यालयाजवळ अज्ञात भामट्याने शेतकऱ्याचे लक्ष विचलीत करून त्याच्याकडील ८० हजारांची तर दुसऱ्या घटनेत एकाकडील ४१ हजारांची अशी एकूण १ लाख २१ हजारांची रोकड लांबविल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भगवान काशीनाथ मोरे (वय ४३ रा. बहाळ ता.चाळीसगाव) हे शेतीचे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी २ मार्च रोजी भगवान मोरे हे कामानिमित्त चाळीसगाव शहरात आलेले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चाळीसगाव स्टेशन रेाडवरील राष्ट्रीय महाविद्यालयाजवळ असतांना त्यांच्याजवळ कापडी पिशवीत ठेवलेली ८० हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविली. त्याचवेळी त्याच परिसरात शेनफडू आनंदा बागुल रा. चाळीसगाव यांच्याजवळील ४१ हजार रूपयांची रोकड देखील लांबविली. एकच वेळी दोन घटनेत एकुण १ लाख २१ हजार रूपये चोरून नेल्याचे समोर आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत पाटील हे करीत आहे.