भुसावळ पोलिसांची कामगिरी
भुसावळ (प्रतिनिधी) :- चोरट्यांनी बंद घर फोडून केलेल्या घरफोडीप्रकरणी दोन संशयिताना अटक केली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघेही संशयित थेट गडचिरोली जिल्ह्यातील असून पोलिसांनी कसून तपास करीत हि कारवाई केली आहे.
पोलिसांनी आरोपींचा माग काढत नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज भागातून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. व्यंकटी रामा गोडमारे (३८) व हितेश देविदास ठेंगरी (२८, देसाईगंज, गडचिरोली) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत. दरम्यान, आरोपी गोडमारे हा कुविख्यात आरोपी असून त्याच्याविरोधात गडचिरोली जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. शिवदास दौलत पाटील हे कुटूंबासह नाहाटा चौफुलीजवळील हुडको कॉलनीत वास्तव्यास आहेत. मंगळवार, ७ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या खरेदीसाठी पाटील कुटूंब सकाळी साडे अकरा वाजता बाहेर पडले. ही संधी चोरट्यांनी हेरत बंद घराचे कुलूप तोडून २५ हजारांची रोकड व ८५ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिणे लांबवले. पाटील कुटूंब खरेदी करून आल्यानंतर दुपारी घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार नोंदवली.
भर दिवसा झालेल्या घरफोडीनंतर बाजारपेठ पोलिसांनी हुडको कॉलनी परीसरातील चोरी झालेल्या घराजवळील तसेच येणार्या-जाणार्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एका ठिकाणी संशयित पायी चालताना दिसून आला. मात्र फुटेज काहीसे स्पष्ट नसल्याने ओळख पटण्यास अडचण होत होती. नाहाटा कॉलेज परीसरातील शिवभोजन केंद्रातील फोटो तपासल्यानंतर त्यात आरोपीने जेवण घेतल्याचे निष्पन्न झाले. मात्र हा डाटा तहसीलकडे जात असल्याने फोटो मिळण्याची अडचण निर्माण झाली तर शासकीय सुट्यांचे दिवस संपल्यानंतर तहसील कार्यालय उघडताच आरोपीचा स्पष्ट फोटो मिळाला मात्र पत्ता फेक असल्याने पुन्हा शोध मोहिमेला बाधा निर्माण झाली. मात्र खबर्याने आरोपी गडचिरोली भागातील असल्याची पक्की टिप दिल्यानंतर पोलिसांचे पथक रवाना झाले.
आरोपी व्यंकटी रामा गोडमारे हा त्या भागातील कुविख्यात असल्याने सहजा-सहजा तरी घरी परतत नव्हता. कारण अनेक पोलिसांमार्फत त्याचा शोध सुरू होता. मात्र गोडमारेच्या जवळच्या नातेवाईकाकडे घर भरणी असल्याने तो कार्यक्रमास येणार म्हणजे येणारच, अशी टिप मिळाल्याने पथकाने फिल्डींग लावली. कुणी दारूच्या गुत्त्यावर तर कुणी पानटपरी साध्या वेशात थांबले. संशयिताला दारूचे व्यसन असल्याने तो दारूच्या गुत्त्यावर येताच त्याच्या पोलिसांच्या पथकाने मुसक्या बांधल्या व भुसावळात आणले. संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
मात्र गुन्ह्यातील मुद्देमाल गडचिरोलीत विकल्याची कबुली दिल्यानंतर शेकडो किलोमीटरचा प्रवास करून दमलेले पथक आल्या पावली पुन्हा गडचिरोलीत पोहोचले व गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. 11 ग्रॅम सोन्याची लगड व २ हजार ७०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून आरोपींची सध्या जळगाव कारागृहात रवागनी करण्यात आली आहे. कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.