जळगाव शहरातील एमआयडीसी भागातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : भरधाव वाहनाने धडक देत कारचा दरवाजा उडवित नुकसान केल्याची घटना मंगळवार दिनांक ३० रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील एमको कंपनीच्या समोर रस्त्यावर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दत्तू भिकन मराठे (वय ४३, रा. नेहरुनगर) यांची एमआयडीसीत चटई कंपनी आहे. ते त्यांच्या मालकीची कार (क्रमांक एमएच १९ सीएक्स ७००५) ने एमआयडीसीतून घराकडे जात होते. एमको कंपनीच्या समोर रस्त्यावर सुसाट वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांच्या कारला जोराने धडक दिली. सुदैवाने मोठी घटना घडली नाही मात्र कारच्या दरवाजाचे मोठे नुकसान झाले. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहन चालकाविरुध्द बुधवार दिनांक ३१ रोजी तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास सहायक फौजदार विजय पाटील हे करीत आहेत.