जामनेर तालुक्यातील पहूर नजीकची घटना
जामनेर (प्रतिनिधी) :- जळगाव येथे दुचाकीवरून मित्राला सोबत घेऊन जात असताना शेंदुर्णी येथील तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. त्यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर दुसरा जखमी झाला. त्याला पाचोरा येथे उपचारासाठी नेण्यात आले. याप्रकरणी पहूर पोलिस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
दीपेश योगेश शिंपी (२३, रा. शेंदुर्णी ता. जामनेर) असे मयताचे नाव आहे. दोन्ही वाहनांची धडक इतकी जबर होती की, दुचाकीचे दोन तुकडे झाले आहेत. दीपेश शिंपी व अक्षय जाधव हे दोघे दुचाकीवरून शेंदुर्णीकडून जळगाव येथे जात होते. पाचोरा-पहूर रस्त्यावरील घोडेश्वर बाबा दर्गाजवळ अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.
धडक देणारे वाहन घटनास्थळावरून फरार झाले आहे. यात दीपेश योगेश शिंपी याला पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तर घटनास्थळावरून अक्षयला पाचोरा येथे हलविण्यात आले आहे. घटनास्थळी पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी गोपाळ माळी, विलास चव्हाण, हंसराज वाघ व हेमंत सोनवणे यांनी पाहणी केली. घटनेची पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.