जळगावातील राष्ट्रीय महामार्गावरील भीषण घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरात सकाळी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात महिला ठार झाल्या होत्या. या घटनेला काही तास उलटत नाही तोच दुपारी १ वाजता दुसरा भीषण अपघात झाला. भरधाव अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीवर मागे बसलेले ७८ वर्षीय वृद्ध इसम अचानक खाली पडले व त्यांच्या अंगावरून वाहन गेल्याने ते जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा दुचाकीचालक हा जखमी झाला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
युसूफ शेख ईस्माईल खाटीक (७८, रा. पारोळा) असे मयत इसमाचे नाव आहे. तर अस्लम शेख युसूफ खाटीक (४४, रा. पारोळा) हे जखमी झाले. हा अपघात शुक्रवार, ५ जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास महामार्गावर गुजराल पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपुलावर झाला. पारोळा येथील रहिवासी असलेले युसूफ शेख ईस्माईल खाटीक व अस्लम शेख युसूफ खाटीक हे पिता-पूत्र जळगावला युसुफ खाटीक यांच्या डोळ्याच्या तपासणीसाठी आले होते.
शुक्रवारी दि. ५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता ते दुचाकीने (क्र. एमएच १९, ईएफ ७५२४) पारोळा येथे परत जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गुजराल पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपुलावरून त्यांच्या दुचाकीला भरधाव अवजड वाहनाने त्यांना धडक दिली. दुचाकीवर मागे बसलेले युसूफ शेख यांचा अचानक तोल गेला व ते खाली पडले आणि मागून येणाऱ्या भरधाव वाहनाखाली आल्याने ते जागीच ठार झाले.
अपघातानंतर नागरिकांनी धाव घेऊन मृतदेह कापडाखाली झाकला व अपघातग्रस्त वाहन बाजूला करीत वाहनांना मार्ग मोकळा करून दिला. या वेळी वडिलांचा मृतदेह पाहून अस्लम शेख हे नि:शब्द झाले होते. काही वाहनधारकांनी त्यांना धीर दिला. घटनास्थळी तालुका पोलिस स्टेशनचे कर्मचारी पोहेकॉ अनिल फेगडे, संजय भालेराव आदी पोहचले व त्यांनी मृतदेह व जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले.
मयत युसुफ खाटीक यांना दोन मुले असून ते हातमजुरी करून त्यांचा कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होते. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.