जामनेर तालुक्यातील गोदरी जवळील घटना
जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील गोदरी येथील रहिवासी तरुण हा घरून कामावर जाण्यासाठी निघाला असता गोदरी गावाच्या बाहेर भरधाव एसटीने त्याच्या दुचाकीला भीषण धडक दिली. या धडकेत तरुण जागीच ठार झाला. ही घटना आज रविवारी दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
निलेश तुकडसिंग नाईक (डांगरे, वय २७, रा. गोदरी ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गोदरी येथे आई, वडील, पत्नी, दीड वर्षाची मुलगी, चार भाऊ यांच्यासह राहत होता. (केसीएन)तर जामनेर येथील रुबी स्टार हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियागृह विभागात सहाय्यक होता. रविवारी निलेश हा त्याची दुचाकी (एम एच २० जीवाय ४५७१) ने कामावर जाण्यासाठी सकाळी साडेसात वाजता निघाला. गाव सोडल्यावर काही अंतरावर सोयगाव डेपोची बस क्रमांक (एम एच २० बीएल २३९३) ने त्याला जबर धडक दिली.
धडकेमध्ये त्याची दुचाकी दूरवर फरफटत गेली. त्यात निलेश जागीच ठार झाला. फत्तेपुर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच ग्रामस्थांच्या मदतीने जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे त्याला दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. (केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी रुग्णालयात आक्रोश केला होता. तर अपघात करणारी बस व बस चालक ताब्यात घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. दरम्यान या घटनेमुळे गोदरी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला होता.