जळगाव शहरात संभाजीनगर रस्त्यावर थरार
मुलगी वाट पाहतच राहिली, समोर झाला आईचा अपघात !
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरात गुरुवारी दि. १९ जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास एका मद्यधुंद चारचाकी वाहन चालकाने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या ४५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या अपघातात अन्य दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून, संशयित आरोपी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही हृदयद्रावक घटना शहरातील महाबळ ते वाघनगर रस्त्यावर घडली.
वंदना सुनील गुजराथी (वय ४५, रा. पार्वती नगर, जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या पती सुनील, मुलगी तनिषा यांच्यासह राहतात. पती सुनील यांचा औषध विक्रीचा व्यवसाय असून त्यावर परिवाराचा उदरनिर्वाह करतात.(केसीएन)गुरुवारी दि. १९ जून रोजी वंदना गुजराथी ह्या महाबळ परिसरात मैत्रिणीकडे मुलगी तनिषासह भेटण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, महाबळ ते संभाजीनगर दरम्यान उतरतीचा रस्ता असल्याने व उतरतीची भीती वाटत असल्याने वंदना ह्या दुचाकीवरून उतरल्या. त्यांची मुलगी तनिषा हि पुढे जयराम हाईट्स बिल्डिंगजवळ थांबल्या. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास उतरतीवर पायी जात असताना शहराकडून वाघनगरकडे भरधाव वेगात येणाऱ्या एका चारचाकी चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, वंदना गुजराथी १५ ते २० फूट दूर फेकल्या गेल्या. दुसऱ्या बाजूला आईचा अपघात पाहताच मुलगी धावत गेली. वाहनचालक एवढ्यावरच न थांबता, मद्यधुंद अवस्थेत त्याच वेगात पुढे जात आणखी दोघांना धडक दिली. त्याने वाघनगर परिसरातील काही घरांच्या बाहेरील कुंड्या आणि बाकही तोडले.
काही नागरिकांनी चालकाचा पाठलाग केला. त्याला कोल्हे हिल्स परिसरात गाठून पब्लिक मार बसला. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर आणि तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रामानंद नगर पोलिसांनी तपास करून मद्यधुंद वाहन चालक मोंटू सैनी याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. जखमी वंदना गुजराथी यांना काही नागरिकांनी तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र शुक्रवारी २० जून रोजी सकाळी ७ वाजेच्यापुर्वी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महाबळ ते वाघनगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उतार असल्याने या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात. भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांवर लगाम घालण्यासाठी या ठिकाणी तात्काळ गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.