भडगाव- वाक रस्त्यावर घडली घटना
भडगाव (प्रतिनिधी) :- भडगाव – वाक रस्तादरम्यान वाळू डंपरने धडक दिल्याने ३ म्हशी ठार तर एका म्हशीला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.
भडगाव शहरातील पेठ भागातील पशुपालक आपल्या म्हशी चारण्यासाठी शेतात घेऊन जात असताना भडगाव वाक रस्त्यावर जुना महिदंळे रस्त्याच्या अलीकडे विटभट्टी जवळ वाककडुन भडगावकडे येणारा डंपर (एम एच ४३ -बीपी ७८४२) ने समोरून येणाऱ्या म्हशींना जोरदार धडक दिली. यात ४ म्हशी पैकी ३ म्हशी जागेवर ठार तर एक म्हशीला गंभीर दुखापत झाली आहे.
धडकेची तीव्रता एवढी जोरदार होती की, चार पैकी तीन म्हशी जागीच मयत होवुन चक्क डंपरच्या खाली अडकल्या होत्या. त्यांना जेसीबीच्या साह्याने डंपर घालुन ओढुन काढव्या लागल्या. म्हशीना धडक देणारे डंपर तालुक्यातील वाक येथील असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. घटनेची माहिती मिळताच वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणुन घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.
म्हशींना धडक देणारा डंपर अवैध गौण खनिज वाहतूक करणारा व भरधाव वेगाने रस्त्यावर धावत होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली. दरम्यान, डंपर पोलीस स्टेशनला जप्त आहे. तहसीलदार यांना रिपोर्ट पाठवलेला आहे. अद्याप तक्रार नाही. तक्रार येताच गुन्हा दाखल करण्यात येईल. रिकामा डंपर होता अशी माहिती मिळाली आहे. डंपर मालकावर अगोदरच एक कारवाई सुरू आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली आहे.