जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथे श्रीकृष्ण लॉनसमोर रिक्षाची वाट पाहत असताना अज्ञात दुचाकीस्वाराने एका ४८ वर्षीय व्यक्तीला जोरदार धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी, १२ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता घडली. याप्रकरणी गुरुवारी, १३ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देविदास भगवान साबळे (वय ४८) हे जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको भागात आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. ते मुलगा प्रशांत साबळे यांच्यासोबत बॅण्ड वाजवून आपला उदरनिर्वाह करतात. १२ फेब्रुवारी रोजी देविदास साबळे व त्यांचा मुलगा प्रशांत हे जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे वाजंत्री वाजवण्यासाठी गेले होते. लग्नातील कार्यक्रम आटोपून देविदास साबळे व त्यांचा मुलगा प्रशांत हे शिरसोली गावातील श्रीकृष्ण लॉन्सजवळ रात्री ९.३० वाजता रिक्षाची वाट पाहत होते. त्यावेळी दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईबी ४८४७) वरील दुचाकीस्वाराने वाहन भरधाव वेगाने चालवून रस्त्यावर उभे असलेले देविदास साबळे यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर दुचाकीस्वार हा घटनास्थळाहून पसार झाला होता.
याप्रकरणी प्रशांत साबळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोहेकॉ रामदास कुंभार हे करीत आहेत.