जळगाव तालुक्यातील विटनेर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- लग्नाहून परतत असताना भरधाव दुचाकी घसरुन दुभाजकावर आदळून भीषण अपघात बुधवारी दुपारी झाला. या अपघातात दुभाजकाजवळ असलेल्या पत्र्याने मानेची नस कापली जाऊन दुचाकीवरील मागे बसलेला १६ वर्षीय मुलगा ठार झाला आहे. एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे. बुधवार ३ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता जळगाव तालुक्यातील जळके गावाजवळ हा अपघात झाला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चेतन दीपक वराडे (१६, रा. विटनेर, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर पुष्पल राजाराम गायकवाड (२०, रा. विटनेर, ता. जळगाव) हा तरुण जखमी झाला आहे. चेतन वराडे हा मुलगा इयत्ता दहावीला होता. चेतन व त्याच्या गावातीलच पुष्पल गायकवाड हे बुधवारी दुचाकीने लग्नाला गेले होते. लग्नाहून परतत असताना दोघांची दुचाकी अचानक वावडदे ते विटनेर दरम्यान जळके गावाजवळ घसरली. दुचाकी घसरून ती दुभाजकावर आदळली व दुभाजकावरील पत्र्याने चेतनच्या मानेची नस कापली गेली. यात रक्तस्राव होऊन गंभीर दुखापत झाल्याने चेतन याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वार पुष्पल यालाही मार लागला असून तो सुद्धा या अपघातात जखमी झाला आहे.
अपघातानंतर चेतन व जखमी पुष्पल या दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चेतन याला मयत घोषित केले. जखमी पुष्पल याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच चेतन यांच्या नातेवाईक व तसेच मित्र परिवाराने रुग्णालयात धाव घेतली. चेतनच्या कुटुंबियांनी रुग्णालयात मोठा आक्रोश केला. मयत चेतनच्या पश्चात आई, वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. आई – वडील दोघेही हातमजुरी करतात. मोठ्या भावाबरोबर चेतन सुद्धा आई-वडिलांना काम करून हातभार लावत होता. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.