जळगावातील गुजराल पेट्रोल पंप चौकातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील गुजराल पेट्रोल पंप चौकामध्ये रस्ता ओलांडत असलेल्या वृद्धाला भरधाव डंपरने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पुंडलिक भिका पाटील (वय ७५, रा.शिवराणा नगर, जळगाव) असे मयत वृद्ध इसमाचे नाव आहे. शिवराणा नगरात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे यांच्यासह राहत होते. ते सेवानिवृत्त शिक्षक होते. मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते ओवरब्रिज जवळ रस्ता ओलांडत असताना त्यांना भरधाव डंपरने धडक दिली. या धडकेमध्ये ते गंभीर जखमी झाले.
त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे नागरिकांनी दाखल केले असता त्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ उटगे यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
दरम्यान रामानंदनगर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धावं घेतली. तसेच घटनेची माहिती जाणून घेतली. रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.