जळगावातील बळीरामपेठ येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील बळीराम पेठ परिसरात तिक्ष्ण हत्यार, चॉपर व फायटर सोबत ठेवणाऱ्या तिन जणांना शहर पोलीसांनी बुधवारी ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांच्याकडून धारदार व तिक्ष्ण शस्त्रासह इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील टॉवर चौक ते बळीरापेठ मधील कारंजा चौकादरम्यान, काही तरुण परिसरात दहशत माजविण्यासाठी धारदार चॉपर, फायटर व चाकू घेवून फिरत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना संशयितांचा शोध घेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने कारवाई करत बुधवारी २० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता विशाल रविंद्र जयस्वाल (वय २०, रा. लक्ष्मीनगर), सनी उर्फ निलेश बाजीराव तायडे (वय १९, जैनाबाद) व हर्षल सुकदेव इंगळे (वय २४, रा. जैनाबाद) या तिघांना ताब्यात घेतले. तिघांकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोकॉ रतन गिते यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर निकुंभ करीत आहे.