जळगाव शहरातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘भारत फायनान्स’ या खासजी बँकेत ३१ लाख १२ हजार १६४ रुपयांचा मोठा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बँकेच्या ५ माजी वसुली अधिकाऱ्यांनी कर्जदार महिलांकडून हप्त्याची रक्कम वसूल करून ती बँकेत जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


बँकेचे शाखा व्यवस्थापक मनीष देवचंद चौधरी (वय ३१) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. हा सर्व गैरप्रकार ८ डिसेंबर २०२२ ते १ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला. बँकेचा वार्षिक ऑडिट रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. तपासणी दरम्यान असे दिसून आले की, कष्टकरी महिलांना दिलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी ३३६ महिलांकडून नियमितपणे हप्ते गोळा केले होते. मात्र, ही रक्कम बँकेच्या खात्यात जमा करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी परस्पर हडप केली.
तपासणीअंती ५ माजी वसुली अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. यात शेख अबिद शादुल्ला (रा. सावरगाव, जि. बुलढाणा) यांनी २१५ महिला सदस्यांकडून ७ लाख १६ हजार रुपयांची वसुली केली, पण बँकेत भरली नाही. प्रदीप हरिचंद्र पवार (रा. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) याने ३४ महिलांकडून ८ लाख ७० हजार रुपयांची रक्कम घेतली. अश्विन रवींद्र पाटील (रा. मुक्ताईनगर) याने ४९ महिलांकडून ६ लाख ८७ हजार रुपये घेतले.
अक्षय शंकर बारी (रा. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) याने २० महिलांकडून ४ लाख ९० हजार रुपये परस्पर हडपले. सचिन भिवसिंग राठोड (रा. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) याने १८ महिलांकडून ३ लाख ४७ रुपये घेतले. बँकेने दिलेल्या तक्रारीनुसार, या पाचही जणांनी मिळून एकूण ३१ लाख १२ हजार १६४ रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, रामानंद नगर पोलीस पुढील तपास करत आहेत









