शहरात भव्य शोभायात्रेने गणेशवाडी परिसर झाला भक्तिमय
जळगाव (प्रतिनिधी) :- आध्यात्मिक उन्नतीसाठी श्रीमद् भागवत कथा ही प्रेरणादायी ठरते. त्यासाठी भगवंताचे नामस्मरण, चिंतन, मनन हे आयुष्यात खूप महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शहरातील गणेशवाडी परिसरात सुरु असलेल्या संगीतमय श्रीमद भागवत कथेत रविवारी परिसरातून भव्य शोभायात्रा काढून या कथेची सांगता झाली. त्या वेळी ना.पाटील बोलत होते.
शोभायात्रेत महिला, पुरुषांसह लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्र मंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त जळगाव शहरातील गणेशवाडी भागामध्ये श्रीदत्त मंदिर परिसरात महापालिकेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती मंगला चौधरी व विठोबा चौधरी यांच्यातर्फे संगीतमय भव्य दिव्य श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या सातव्या दिवशी हभप देवदत्त मोरदे महाराज यांनी सुदामा चरित्र कथा सुश्राव्य केली. सुरुवातीला सुदामा यांच्या चरित्राविषयी हभप मोरदे महाराज यांनी भाविकांना माहीती दिली.
कथा झाल्यानंतर महाआरती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, देविदास धांडे, पवन पांडे, नंदराज चौधरी, अनिल चौधरी, सोनी शेठ, रवींद्र शर्मा यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी परिसरात वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेच्या अग्रस्थानी हभप देवदत्त महाराज बग्गीत विराजमान होते. दिंडीत महिला डोक्यावर ग्रंथ, तुळसी आणि कळस घेऊन सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
शोभायात्रा गणेश वाडी, जानकी नगर, कासम वाडी, मंजुषा कॉलनी या मार्गाने मार्गस्थ झाली. सोमवारी सकाळी ९ वाजता काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
मैत्रीत भेदभाव नसतो
श्रीकृष्णा आणि सुदामा सारखी मैत्री जगात तुम्हाला कुठेही सापडणार नाही. मैत्रीमध्ये गरीब – श्रीमंत, श्रेष्ठ – कनिष्ठ असा कधीही भेदभाव होत नाही. मुठभर पेराल तर गावभर मिळेल. तुम्ही देवाचे ध्यान करा, पूजा – अर्चा करा परमेश्वर तुम्हाला त्याचे फळ नक्की देईल. देवासाठी स्वतःला विसरून जावे लागले. श्रीमंत आणि गरीब असा भेट न करता निर्मळ अंतकर ओळखून परमेश्वर भेटतो, असेही हभप मोरदे महाराज यांनी यावेळी आपल्या मधुर वाणीतून सांगितले.