पाचोऱ्याच्या रितेश पाटीलसह २५ जणांविरुद्ध गुन्हा; ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

मध्यरात्री थरार; कारवाईत अडथळा गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार महसूल सहाय्यक प्रशांत सावकारे, मिलिंद निकम, रामकृष्ण मनोरे व पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने सोमवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास गस्त सुरू केली. रात्री १० वाजता गिरड-मांडकी रस्त्यावर वाळूने भरलेले एक जेसीबी, दोन डंपर आणि एक ट्रॅक्टर पथकाला मिळून आले. पथकाने ही वाहने जप्त करण्याचा प्रयत्न केला असता चालक वाहने सोडून पसार झाले.
स्कॉर्पिओतून आले माफिया; पोलिसांवर दगडफेक काही वेळातच पाचोरा येथील रितेश पाटील हा काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आपल्या २०-२५ साथीदारांसह घटनास्थळी दाखल झाला. त्याने पथकाशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. “वाहने कशी नेतात तेच बघतो,” अशी धमकी देत त्याने कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. यावेळी जमावाने आरडाओरड करत पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने अतिरिक्त पोलीस कुमक पाचारण करण्यात आली, त्यानंतर माफियांचा जमाव अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
३७ लाखांची वाहने जप्त परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर प्रशासनाने नवीन चालकांच्या मदतीने जप्त केलेली सर्व वाहने तहसील कार्यालयात लावली. यामध्ये १५ लाखांचे जेसीबी, प्रत्येकी १० लाखांचे दोन डंपर आणि २ लाखांचा ट्रॅक्टर असा एकूण ३७ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कडक कारवाईचा इशारा याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा (रजि. नं. ४७८/२०२५) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पाटील करत आहेत. वाळू चोरी आणि शासकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा कडक इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.









