भडगाव शिवारात मांडकी शिवारात घटना
भडगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील मांडकी शिवारात शॉर्टसर्किटमुळे शेतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत शेतकऱ्याचा उभा ऊस आणि सिंचनासाठी अंथरलेला ठिबक संच जळून खाक झाला असून, सुमारे ४ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

मांडकी शिवारातील गट क्रमांक १३७/२/अ मध्ये विकास भगवंत पाटील (रा. पाचोरा, मूळ रा. गिरड) यांची शेती आहे. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:१५ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतात अचानक शॉर्टसर्किट झाले. वाळलेला पाला पाचोळा आणि वाऱ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत पाटील यांच्या शेतातील कापणीला आलेला ऊस मोठ्या प्रमाणावर जळाला आहे. तसेच ऊसाला पाणी देण्यासाठी बसवलेले ठिबक सिंचनाचे संच आणि पीव्हीसी पाईप पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. यामध्ये अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी विकास पाटील यांनी भडगाव पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यावरून भडगाव पोलिसांनी आकस्मिक आगीची नोंद केली आहे. भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटील या घटनेचा पुढील तपास करत आहेत.अचानक लागलेल्या या आगीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.








