तांदुळवाडी शिवारातील घटनेने खळबळ
भडगाव – तालुक्यातील कजगाव येथून जवळच असलेल्या तांदुळवाडी शिवारातील शेतात अज्ञान व्यक्तीने दीड ते दोन एकर शेतातील कपाशी उपटून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घडलेल्या घटनेने कजगाव परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मळगाव येथील रहिवासी मीराबाई उत्तम गायकवाड व ग्रा प सदस्य सचिन गायकवाड यांच्या आईच्या मालकीचे शेत तांदुळवाडी शिवारात असून येथील साधारणत दीड ते दोन एकर जमिनीतील कपाशी पीक उपटून अज्ञात माथेफिरू ने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शेतकरी हे आदिवासी समाजातील असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. घटनास्थळी झालेले नुकसान पाहून.मीराबाई गायकवाड यांनी आक्रोश करून आपला संताप व्यक्त केला. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. घटनास्थळी सरपंच गुलाब पाटील पोलीस पाटील रेश्मा मरसाळे, तंटामुक्ती अध्यक्ष जयंत पाटील , दीपक पाटील ,दादाभाऊ पाटील, स्वप्नील पाटील, प्रताप परदेशी रतन बैरागी यांनी पाहणी केली. यावेळी मळगाव तांदुळवाडी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
आदिवासी भिल्ल समाजातील मीराबाई गायकवाड यांना न्याय मिळून त्या अज्ञात माथेफिरू व्यक्तीला त्वरीत अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे. :शेतकऱ्याला प्रशासनाकडून त्वरित मदत मिळावीअशी मागणी होत आहे.