जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांचे आवाहन
भडगाव (प्रतिनिधी) :- शेतकऱ्याचे हित आणि गोरगरीब जनतेसाठी सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवायचा असेल तर बीआरएस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या केसीआर सरकारच्या नेतृत्वाची गरज आहे. यासाठी शेतकरी नवतरुण युवकांनी भारत राष्ट्र समितीसोबत यावे असे प्रतिपादन जळगाव जिल्हा अध्यक्ष व उद्योजक लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी केले आहे.
भडगाव येथील कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. तेलंगणा सरकारने जमिनीत पाणी मुरवून दुष्काळ कायमस्वरूपी हद्दपार केला व त्याच पाण्यावर शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीस उपलब्ध करून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक पाणी व हमीभावाने मालाची खरेदी पेरणीसाठी शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये अनुदान शेतकऱ्याचा कुठल्याही परिस्थितीत मृत्यू झाला तरी पाच लाख रुपये दहाव्याच्या आत वारसांच्या खात्यावर जमा होतात, असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हा समन्वयक देवेंद्र वराडे, भिकन सोनवणे, अनिल महाजन, सतीश पाटील, विजय साळुंखे, किशोर गरुड, यांच्यासह भडगाव पाचोरा तालुक्यातील असंख्य नागरिकांनी बीआरएस मध्ये प्रवेश केला आहे.