भडगाव तालुक्यातील पासर्डी येथील घटना
भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कजगाव येथून जवळच असलेले पासर्डी गावातील बंद घरांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शनिवार आज दि. २० जुलै रोजी पहाटे ५ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पासर्डी येथील रहिवासी एकनाथ पाटील व युवराज पाटील हे दोघे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. आज २० जुलै रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोघेही घरांचे कुलूप तोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. (केसीएन)या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती गावातील नागरिकांनी व नातेवाईकांनी तात्काळ भडगाव पोलीस स्टेशन येथे दिली. घटनास्थळी भडगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक चंद्रसेन पालकर, सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे, रवींद्र पाटील, अमजद पठाणसह पोलीस कर्मचारी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करत तपासचक्र फिरवायला सुरुवात केली आहे.
या घटनेप्रकरणी फिर्याद दाखल झालेली असून दरोड्यात ८ तोळे सोने, २० भार चांदी, ७० हजार रोकड असा मुद्देमाल लंपास झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. तपास एपीआय पालकर करीत आहे.