अमळनेरात न्यू प्लॉट भागात गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी):- अमळनेर शहरातील न्यू प्लॉट भागात सुमारे ७५ ते ८० वर्षांपासून भाडेतत्त्वावर राहत असलेल्या एका कुटुंबाचे घर जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सुरज गोखलाणी आणि महेश देशमुख यांच्यासह ४ ते ५ जणांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शरद जाधवराव शिंदे (वय ५७, रा. प्रताप कॉलेजसमोर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अमळनेर शहरातील न्यू प्लॉटमधील टी.पी. नंबर ४५/०१ येथे त्यांचे ७५ ते ८० वर्षांपासून भाडेतत्त्वावर असलेले पत्र्याचे दोन खोल्यांचे घर आहे. १० फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६:३० वाजेच्या सुमारास आरोपी सुरज गोखलाणी याच्या सांगण्यावरून महेश देशमुख आणि त्यांच्या सोबत असलेल्या ४ ते ५ अनोळखी इसमांनी फिर्यादीची कोणतीही संमती नसताना घरात बेकायदेशीर प्रवेश केला. आरोपींनी कोणतीही पूर्वसूचना न देता फिर्यादीचे घर जेसीबीच्या साहाय्याने पाडून टाकले.
या कारवाईत घरात असलेले लोखंडी गोदरेज कपाट, लोखंडी रॅक, स्टीलचा रॅक, गॅस शेगडी, कुलर आणि दोन पंखे अशा सुमारे २० हजार रुपये किमतीच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ देखील केली. याप्रकरणी ११ फेब्रुवारी रोजी रात्री ९:३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









