जळगाव (प्रतिनिधी)- येथील पुष्पलता बेंडाळे चौकातील नागोरी चाय या ठिकाणी व्यावसायिक वादावरून भांडण काढून तीन तरुणांसह त्यांच्या आईने एका तरुणाला डोक्यावर बाटली फोडून तसेच शरीरावर फुटलेल्या बाटल्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
विशाल युवराज सोनवणे हा तरुण नवीन बी. जे. मार्केट येथील भंगार व्यावसायिक आहे. त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, शनिवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास बेंडाळे चौकात विशाल हा त्याची पत्नी हिच्यासह चहा पिण्यासाठी नागोरी चाय या दुकानात गेला होता. तेथे दीपा नामक महिला व तिचे तीन मुले राहुल, दिनेश, गोलू यांनी आमचे भंगाराचे दुकान असूनही तू प्लास्टिक, बाटल्या का गोळा करतो अशा क्षुल्लक कारणावरून डोक्यात बाटली मारून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करीत फुटलेली काचेची बाटली शरीरात पाठीला, पोटाला मारून दुखापत केली. तसेच, राहुल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ते अवैध व्यवसाय करतात असा आरोप विशाल सोनवणे याने केला.