बोदवड तालुक्यातील गोळेगाव येथील शेतजमिनीप्रकरणी निकाल
जळगाव (प्रतिनिधी) :- बोदवड तालुक्यातील गोळेगाव येथील बेकायदेशीर जमीन सरकार जमा करण्याचे बोदवड येथील तहसीलदारांनी आदेश दिले आहेत. हे आदेश शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर रोजी दिले आहेत.
भुसावळ येथील भ्रष्टाचार निर्मूलन जनहित संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव काशीराम इंगळे यांनी बोदवड येथील तहसीलदार अनिल वाणी यांचे न्याय प्राधिकरणात तक्रार दाखल केली होती. राजेंद्र जवरीलाल जैन (रा. वरणगाव ता. भुसावळ) यांची बोदवड तालुक्यातील गोळेगाव शिवारामध्ये असणारी शेतजमीन ही ते शेतकरी नसताना देखील त्यांनी राजस्थान येथून शेतकरी असल्याचा बनावट दाखला सादर करून खरेदी केली होती. संपूर्ण कागदपत्रांसह राजस्थानचा बनावट दाखला आणि त्यांचे पत्नीच्या नावाचा कविता हुकुमचंद जैन असा उतारा जोडून राजेंद्र जैन यांनी जमीन खरेदी केली,अशी तक्रार उत्तम इंगळे यांनी दि. ३ एप्रिल रोजी दाखल केली होती. या अर्जावर सखोल सुनावणी होऊन तहसीलदार अनिल वाणी यांनी राजेंद्र जवरीलाल जैन यांची गोळेगाव येथील जमीन ही बेकायदेशीर असल्याचे सांगून सरकार जमा करण्याचे आदेश पारित केले आहेत. अर्जदार उत्तम कांबळे यांच्या वतीने ॲड. हरूल देवरे यांनी कामकाज पाहिले.