जळगाव (प्रतिनिधी ) ;- आगामी मान्सुन कालावधीत जिल्ह्यात आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास सर्व यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेवून परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी केले आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मान्सून पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसिंह रावळ हे उपस्थित होते. तर जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, महसुल विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, शोध व बचाव साहित्याची तपासणी करुन सर्व साहित्य सुस्थितीत ठेवावे, मान्सुनकाळात आपत्ती प्रवणक्षेत्रात पुरेसा धान्यसाठा व वितरण करण्याचे नियोजन करावे. अंत्योदय योजनेतंर्गत लाभार्थ्यांना मान्सुन काळात धान्य पुरवठ्याचे नियोजन करावे. आरोग्य विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांबाबत पुरेसा औषधसाठा करुन ठेवावा. आवश्यक औषधसाठ्याची मागणी नोंदवावी, जलजन्य व किटकजन्य आजार होवू नयेत याबाबत दक्षता घ्यावी. पाटबंधारे विभागाने धरणनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन पुररेषा निश्चित करावी. धरणातून विसर्ग सुरु करणार असल्यास त्याबाबतची माहिती दवंडी, सायरण यंत्रणेद्वारे द्यावी, हवामान खात्याकडून येणारे संदेश शेतकऱ्यांना वेळेत पोहोचविण्याचे काम कृषि विभागाने करावे. बांधकाम विभागाने रस्त्यांवरील पुल, पडणारी झाडे तसेच पाझरतलाव यांची पाहणी करुन घ्यावी तर नगरपालिकांनी आपल्याकडील अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवावी, वीज वितरण कंपनीने लोंबकळणाऱ्या तारा, उघडे ट्रान्सफार्मर, धोकेदायक पोल यांची दुरुस्ती करावी. आपत्तीच्या काळात कोणीही पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडणार नाही याची सर्व संबधित विभागांनी दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वाना दिलेत.