वनविभागाकडून लावले तीन पिंजरे ; रविवारी आणखीन तरुण बचावला


चाळीसगाव (प्रतिनिधी) : गणेशपुर पिंपरी येथे १२ वर्षीय रिकेश नंदू मोरे या मुलावर बिबट्याने हल्ला करुन ठार केल्याची दुदैवी घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली. रविवारी संकाळी मृत मुलावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बिबट्याने ज्या ठिकाणी रिकेशचा बळी घेतला, त्याठिकानासह इतर दोन ठिकाणी वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तीन पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. दरम्यान बिबट्या रात्री पिजारा लावलेल्या ठिकाणी येवून गेला, तर संकाळी त्याने वनविभागाच्या नाकावर टिच्चून गावातूनच एका कुत्र्याची शिकार केल्याची चर्चा आहे.
बिबट्या गणेशपुर-पिंपरी शिवारात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भिंती वातावरण पसरली आहे. त्यामुळे वनविभागाचे पथक घटनास्थळी तळ ठोकुन आहे. वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिजऱ्यासह ट्रॅप कॅमेरे लावलेत. तर संकाळी पुन्हा दोन ठिकाणी पिजरे लावण्यात आल्याची माहिती पोलीस पाटील यांनी दिली आहे. दरम्यान रात्री पिजारा लावलेल्या ठिकाणी बिबट्या येवून गेला. परंतू तो पिजऱ्यात शिरला नसल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात दिसत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान रिकेशचे कुटूंब हे मोलमजुरी करणारे कुटूब आहे. त्यामुळे शासनाकडून तातडीने त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे. गणेशपुर वलठाण शिवारात रविवारी सायंकाळी नरभक्षक बिबट्याने पुन्हा विश्राम पावरा या तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून तो झाडावर चढला आणि पुन्हा ट्रॅक्टरवर उडी घेतल्याने त्याचा जीव थोडक्यात वाचला. परंतु बिबट्या त्याचा झाडावरच शोध घेत राहिला. बिबट्याच्या तोंडाला आता मानवाचे रक्त लागले आहे. आणि नरभक्षक झाला असून त्याचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
सर्व गावातील नागरिकांना पोलीस स्टेशन तर्फे अहवान करण्यात आले आहे. रात्री अपरात्री घराबाहेर कोणीही एकटे जाऊ नये. तसेच बिबटयाचा वावर असल्यामुळे लहान मुलांना व्यायाम करणे किंवा रनिंग करणे साठी मुलांना गावाबाहेर जाऊ देऊ नये. नागरिकांनी सतर्क राहावे, असे कळविण्यात आले आहे.









