खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नांना यश
जळगाव (प्रतिनिधी ) — जळगावहून दिल्ली येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या सर्वाधिक सोयीची रेल्वे गाडी असलेली राजधानी एक्सप्रेस ही सप्ताहात तीन वेळेस धावत होती.मात्र या गाडीला नियमित करण्यात यावी. यासाठी सातत्याने जळगाव शहरातील व्यापारी ,उद्योजक, प्रतिष्ठित नागरिकांकडून खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याकडे मागणी केली जात होती. या अनुषंगाने खासदार उन्मेश दादा पाटील यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल, रेल्वे बोर्डाचे चेअरमन सूनित शर्मा, जनरल मॅनेजर संजीव मित्तल मुंबई यांच्याकडे सातत्याने संपर्क करून प्रत्यक्ष भेटून व पत्राद्वारे राजधानी स्पेशल एक्सप्रेस नियमित करण्यात यावी अशी मागणी केली होती. दि.19 नोव्हेंबर 2020 रोजी जनरल मॅनेजर संजीव मित्तल यांच्या सोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीत जोरदार मागणी करण्यात आली होती.आज ही मागणी मंजूर करण्यात आली असून ही गाडी 19 जानेवारी पासून राजधानी स्पेशल एक्सप्रेस नियमित धावणार आहे.
प्रवाश्यांमध्ये आनंद..
राजधानी स्पेशल एक्सप्रेस( 01221/01222) ही गाडी जळगाव स्थानकावर दररोज थांबणार असल्याने दिल्लीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. राजधानी स्पेशल एक्सप्रेस धावणार असल्याच्या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील व्यापारी ,उद्योजक, डॉक्टर, उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी , प्रतिष्ठित सामाजिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.








