जळगाव ( प्रतिनिधी ) – यावल ते भुसावळ मार्गावर बायो डिझेलची अवैध विक्री करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांना या अवैध बायो डिझेल विक्रीबद्दल गुप्त माहिती मिळाली होती . त्यांनतर स फौ युनूस शेख , हे कॉ महेश महाजन , पो ना किरण धनगर , प्रमोद लाडवंजारी यांच्या पथकाने यावलचे पो नि सुधीर पाटील यांना माहिती दिली . त्यानंतर पो नि सुधीर पाटील यांच्यासह यावलचे पो उ नि विनोद खांडबहाले , स फौ मुजफ्फर खान , पो कॉ राहुल चौधरी , सुशील घुगे , राजेश वाडे यांनी यावल ते भुसावळ मार्गावरील महाराष्ट्र गुजरात ढाब्याजवळ जाऊन मिळालेल्या माहितीची खात्री केली . तेथे एक जण रस्त्यावरच्या वाहनांना हातवारे करून इशारे करताना दिसला पोलिसांनी त्याला शिताफीने पकडून त्याची चौकशी केली .
शेरखान जुबेरखान ( रा – काजीपूरा , यावल ) असे या आरोपीचे नाव आहे . त्याच्या ताब्यातून ३ लाख रुपये किमतीचे एम एच ४८ – टी १७८३ क्रमांकाचे बोलेरो पीक अप वाहन आणि त्यातील ९० हजार रुपये किमतीचे १ हजार लिटर्स बायो डिझेल जप्त करण्यात आले . या आरोपीविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .