पाचोरा पोलीस स्टेशनची कामगिरी
पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील बसस्थानक मोबाईल चोरीची घटना घडली होती. मोबाईल चोरीची तक्रार पाचोरा पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. पाचोरा पोलीस स्टेशनच्याकर्मचाऱ्यांनी शिताफीने चोरीला गेलेल्या मुद्देमालासह दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील वृत्तपत्र विक्रेते श्रीराम रेवणनाथ जोशी (वय ४०) हे दि. १७ मे रोजी काही कामानिमित्त पाचोरा बसस्थानकातून पाचोरा ते सुरत एस. टी. बसने धुळे येथे जात असतांना बसमध्ये त्यांच्या पॅंटच्या खिशातून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल चोरला होता. ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी बसमधून खाली उतरुन मोबाईलची शोधाशोध सुरु केली असता बसस्थानकात जळगावच्या गजानन नगर येथील रहिवासी तारकेश राजेंद्र पाटील, पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील शंतनु प्रकाश भालेराव यांचेही मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. हा प्रकार लक्षात येताच वरील तिघांनीही सुमारे ३२ हजारांचे मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार दिल्यावरुन पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्यांच्या अनुषंगाने पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल शिंपी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुरेश पाटील, योगेश अरुण पाटील यांनी सी. सी. टीव्ही व गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषणाचे आधारे माहिती घेत असतांनाच संशयित आरोपी हे एका रिक्षातून बसस्थानकात परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून जारगाव चौफुलीच्या पुढे रस्त्याच्या डाव्या बाजूला संशयित आरोपींना रिक्षा क्रमांक (एम. एच. १९ सी. डब्लू. ११४२) यातून ताब्यात घेतले.
याप्रकरणी नामीज मोहम्मद पठाण (वय ३२, रा. राजमालती नगर, जळगाव), अमजद राशिद शेख (वय ३३, गयाबी नगर, गुलजार नगर, भिवंडी जि. ठाणे) असे हे संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळ अंदाजे ३२ हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल आढळून आले. त्यांना पाचोरा पोलीस स्टेशनला आणून त्यांची गुन्हे संदर्भात माहिती घेतली असता ते गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीला गेलेले मोबाईल जप्त करत सदर गुन्ह्यात वापरलेली रिक्षा हस्तगत केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल काशीनाथ शिंपी करीत आहेत.
सदरील कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पाचोरा उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक पवार, डी. बी. पथकाचे प्रभारी अधिकारी राहुल शिंपी, पोलिस हेडकॉन्स्टेबल विश्वास देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुरेश पाटील, योगेश पाटील, संतोष राजपूत यांनी ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली.