धरणगाव येथील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील विविध बसस्थानकात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. धरणगाव बसस्थानक येथे गर्दीचा फायदा घेत एका भामट्याने महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि चार हजारांची रोकडसह ४० हजारांचा ऐवज लांबवला. ही घटना गुरुवारी ७ रोजी दुपारी धरणगाव बस स्थानकात घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात अज्ञात चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारती जालिंदर पाटील (४०, रा.कुकावल, ता.शहादा, जि.नंदुरबार) या गुरुवार, ७ रोजी कुकावल, ता. शहादा येथे जाण्यासाठी धरणगाव बस स्थानकात आल्या होत्या. जळगाव-अंकलेश्वर जाणार्या बसमध्ये त्या चढत असतांना दोन अज्ञात महिलांनी त्यांच्या पर्समधील २१ हजार रुपये किंमतीचे सात ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र, १५ हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे फुल, साखळी आणि ४ हजाराची रोकड असा ऐवज लंपास केला.
दरम्यान, चोपडा बस स्थानक आल्यानंतर भारती पाटील त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. यावेळी बस वाहकाने धरणगाव बस स्थानकात गर्दी होती, त्यावेळी दोन संशयित महिला दिसल्याचे सांगितले. त्यामुळे भारती पाटील यांनी तत्काळ धरणगाव पोलिस स्थानक गाठत तक्रार नोंदवली. पुढील तपास नाईक उमेश पाटील हे करीत आहेत.