चोपडा शहरातील घटना ; भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद
चोपडा (प्रतिनिधी) :- शहरातील स्वस्तिक टॉकीज परिसरात भरधाव बसचे ब्रेक फेल झाल्याने झालेल्या भीषण अपघातात बसने २ दुचाकींना चिरडले असून या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर २ जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार दि. २० मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमीवर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आ. चंद्रकांत सोनवणे यांनी रूग्णालयात धाव घेतली आणि मयतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. दरम्यान ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अपघातात पहिल्या दुचाकीवरील रविंद्र बहारे (वय ४०, रा.चुंचाळे ता. चोपडा) आणि दुसऱ्या दुचाकीवरील सोनू उर्फ रईस पठाण (वय-२२, रा.चोपडा) यांचा जागीच मृत्यू झाला तर अनिता बहारे आणि शाकीर शेख हे जखमी झाले आहे. जखमींना तातडीने चोपडा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही थरारक घटना नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान अपघात बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे समोर आले आहे. दरम्यान या घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी तातडीने उपजिल्हा रूग्णालयात धाव घेवून मयतांच्या नातेवाईकांची भेट घेतली आहे. यावेळी उपजिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची प्रचंड गर्दी पहायला मिळाली. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सोनू पठाण याचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाल्याची माहिती मिळाली.