शिक्षकांनी घेतली पालकांची भेट
शिरसोली ( वार्ताहर ) – दहावीच्या बोर्ड परीक्षा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची तयारी कशी सुरू आहे आणि त्यांना अभ्यासात कोणत्या अडचणी येत आहेत,याचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरसोली येथील शिक्षकांनी ‘ शिक्षक आपल्या दारी ” ही अभिनव मोहीम राबवली आहे. ही मोहीम संस्थेचे अध्यक्ष निलेश खलसे व शालेय समितीचे चेअरमन दिलीप बारी व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज बारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

गेल्या सहा महिन्यापासून प्रत्येक शिक्षकांनी १० विद्यार्थी दत्तक घेऊन या उपक्रमांतर्गत शाळेतील शिक्षक स्वतः शालेय कामकाज संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अभ्यासाची बारकाईने पाहणी करत असून विद्यार्थी खरोखर मनापासून अभ्यास करत आहेत का,त्यांचे वेळापत्रक कसे आहे आणि त्यांना कोणत्या विषयांत विशेष मदतीची गरज आहे, हे शिक्षक प्रत्यक्ष भेटीतून समजून घेत आहेत.
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवरील ताण तणाव कमी करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असून शिक्षकांनी केवळ विद्यार्थ्यांशीच नव्हे,तर त्यांच्या पालकांशीही सविस्तर चर्चा केली आहे.”घरात अभ्यासासाठी पोषक वातावरण कसे असावे, मोबाईलचा वापर कसा टाळावा आणि मुलांच्या आहाराकडे कसे लक्ष द्यावे,” याबद्दल शिक्षकांनी पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले असून पालकांनी देखील शाळेच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे.
शाळेने केवळ वर्गापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचून घेतलेली ही दखल खरोखरच कौतुकास्पद असून,या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढली आहे व बोर्ड परीक्षेत शाळेचा निकाल उत्तम लागेल, असा विश्वास मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर व पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील, आणि शिक्षकांनी व्यक्त केला असून शिरसोली परिसरातील स्थानिक नागरिक आणि शिक्षण क्षेत्रातून या मोहिमेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.









