सोलापूर ( प्रतिनिधी ) – अवघ्या 16 महिन्यांच्या पोटच्या मुलीवर बापाने बलात्कारानंतर गळा आवळून हत्या केली आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न असताना लोहमार्ग पोलिसांनी बापासह चिमुकलीच्या आईलाही बेड्या ठोकल्या. सोलापुरात ही घृणास्पद घटना उघडकीस आली आहे.
मूळ राजस्थानचे असलेले हे जोडपे मुलगा आणि 16 महिन्यांच्या चिमुरड्याच्या मुलीसह हैदराबादमध्ये राहत होते. पत्नी आणि मुलगा झोपी गेले असताना आरोपीने मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मुलीचा मृतदेह घेऊन तो सिकंदराबाद-राजकोट एक्स्प्रेसने राजस्थानमधील मूळगावी निघाला.
ट्रेनमधील प्रवाशांना संशय आल्यामुळे त्यांनी वाडी येथे पोलिसांशी संपर्क साधला. मात्र गाडी तोपर्यंत स्टेशनवरुन पुढे निघून गेली होती. ही गाडी सोलापूर स्टेशनवर गुरुवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास पोहोचली, तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या कृत्यात त्याला पत्नीचीही साथ असल्याचं उघडकीस आलं आहे. हा गुन्हा हैदराबाद पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.