चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील चिंचखेडा शिवारात शेतकऱ्याच्या डोक्यात मध्यरात्री लाकडी दांडक्याने खून केल्याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे फिरवून केवळ ८ तासात संशयित आरोपींना अटक केली आहे. वडील घरखर्चासाठी, वैद्यकीय खर्चासाठी पैसे देत नसल्याने आणि शेतीकामात राबवून घेत असल्याने त्याचा राग मनात ठेऊन मयत शेतकऱ्याच्या दोन्ही मुलांनीच त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, मोठा मुलगा मुकेश यांचे फिर्याद दाखल केली होती. त्यामुळे फिर्यादीच आरोपी निघाल्याने गावात खळबळ उडाली आहे.
चिंचखेड शिवारातील शेतगट नंबर २७ मध्ये मळयात झोपण्यासाठी गेलेले शेतकरी राजेंन्द्र सुखदेव पाटील (वय ५० रा. देवळी ता. चाळीसगाव) यांचा अज्ञात इसमांनी काहीतरी टणक वस्तुने डोक्यावर मारुन, गळा आवळून निर्धन खुन केला होता. त्यावरुन मयताचा मोठा मुलगा मुकेश राजेंन्द्र पाटील याने दिलेल्या लेखी तक्रारी वरुन मेहुणबारे पोलीस ठाणेस अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर खुनाचे गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, शहर वाहतुक शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक तुषार देवरे, सहा. पोलीस निरीक्षक विष्णु आव्हाड, पोलीस उप निरीक्षक प्रकाश चव्हाणके यांनी घटनास्थळी भेट देवून घडल्या परिस्थीतीचे बारकाईने पाहणी केली व तपासकामी फॉरेन्सीक टिमला पाचारण करून आरोपीताचे तपासकामी वेगवेगळी पथके तयार करुन गोपनिय यंत्रणेमार्फत गुन्हयाचा तपास सुरु करण्यात आला होता.
घटनास्थळाची पाहणी केल्यावर तेथे आढळून आलेले भौतीक पुरावे व रक्ताने माखलेल्या लाकडी काठया, दोरी, तसेच कांदा चाळीचे तुटलेले कुलुप व तेथील कपाशीच्या अस्ताव्यस्त पडलेल्या गोण्या हयांचे बारकाईने निरीक्षण केले असता खुनाचा बनाव केल्याचे दिसुन आले. घटनास्थळी हजर असलेले मयताचे मुलांकडे गुन्हयाबाबत विचारपुस करता त्यांचे जबाबांमध्ये आढळून आलेली विसंगती व त्यांच्या सदर ठिकाणच्या संशयास्पद हालचालींवरुन त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. गावामध्ये त्यांच्या विषयीची माहिती एकत्रीत केली असता यातील मयत व त्याचे मुलांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहीती मिळून आली.
मयताचा मोठा मुलगा फिर्यादी मुकेश राजेन्द्र पाटील (वय २३) व राकेश राजेंन्द्र पाटील (वय २१) यांना चौकशीकामी ताब्यात घेऊन गुन्हयाबाबत विचारपुस करता सुरुवातीस त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यांना अधिक विश्वासात घेतल्यावर त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. वडील राजेंन्द्र सुखदेव पाटील हे आमच्या आईकडून व आमच्याकडून दररोज शेतीमध्ये काबाडकष्ट करून घेत असे. परंतु आम्हाला घरखर्चाकरीता, कपडयांकरीता अथवा वैदयकीय उपचारांकरीता वेळोवेळी पैसे मागुन देखील ते आम्हाला पैसे देत नसल्याने तसेच वारंवार आईला व मुलांना शिवीगाळ करुन मारहाण करीत असल्याने वडीलांचा काटा काढण्याचा मुलांनीच कट रचला.
दोन्ही मुलांनी दि. ८ जून रोजी पहाटे ४ वा. च्या सुमारास वडील शेतामध्ये एकटे झोपलेले असतांना मुकेश राजेन्द्र पाटील व राकेश राजेंद्र पाटील यांनी मळयात मोटार सायकलवर जावुन वडीलांचे डोक्यात लोखंडी पाईपने गंभीर दुखापत केली. नंतर दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून करुन परत रात्री घरी येवुन झोपले. सदर खुन कोणीतरी अज्ञात इसमांनी कपाशी चोरण्याचे इरादयाने केल्याचा देखावा तयार केल्याची देखील कबुली दिली आहे. यातील फिर्यादीच आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपीतांना रात्री उशिरा अटक करण्यात आली असुन पुढील तपास चालू आहे.
सदर खुनाचे गुन्हयाचे तपासात सहा.पो.उप निरीक्षक मिलींद शिंदे, सुभाष पाटील, दिलीप सोनवणे, पोहवा योगेश मांडोळे, पोकों गोरख चकोर, कमलेश राजपूत, भुषण बावीस्कर, दिपक महाजन, निलेश लोहार, योगेश बोडके, प्रविण पाटील, हनुमंत वाघेरे, जितेंन्द्र परदेशी, ईश्वर देशमुख, ज्ञानेश्वर बडगुजर, दिपक नरवाडे, शैलेश माळी, होमगार्ड महेंन्द्र पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पो.उप निरीक्षक अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील यांचे पथकाने मेहनत घेवुन कौशल्याने गुन्हा उघडकीस आणला आहे.