अमळनेर (प्रतिनिधी) : बांधकामाच्या ठिकाणि खेळत असताना पाण्याच्या मोटरला धक्का लागल्याने एका ६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शहरातील डी. डी. नगर परिसरात घडली आहे. याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जगदीश सेनानी (६, रा.मंडवाळी, बडवाणी, मध्य प्रदेश) हा कुटुंबासह धुळे रोड परिसरात असणाऱ्या डी. डी. नगर भागात सुरू असलेल्या घराच्या बांधकामासाठी मजुरी करण्यासाठी कुटुंबासह आला होता. बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरांना पाणी मारण्यासाठी सुरू असलेल्या पाणी मोटारजवळ तो खेळता खेळता गेल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला.
त्याच्या कुटुंबीयांनी त्याला लागलीच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोकॉ चंद्रकांत पाटील करीत आहेत.