एकाकडून १३,५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त
जळगाव (प्रतिनिधी) : बनावट नोटा प्रकरणात पोलिसांनी दोघांना जामनेर येथून अटक केली असून, नजरील याच्याकडून १३ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांना पोलिस कोठडी सुनावण्यासह अटकेतील अगोदरच्या दोघांनाही १६ ऑक्टोबरपर्यंत वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नरजील नासीर खान (वय ३०, रा. जामनेर) व गनी मजीद शेख (४७, रा. तोंडापूर, ता. जामनेर) असे अटकेतील संशयितांची नावे आहेत. नकली नोटा प्रकरणात आतापर्यंत चारजणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील तीनजणांना यावल येथील नईम बदरुद्दीन शेख याने नकली नोटा पुरविल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
चेतन व नईम या दोघांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना १६ ऑक्टोबरपर्यंत वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तसेच जामनेर व तोंडापूर येथून अटक केलेल्यांनाही १६पर्यंत कोठडी सुनावली आहे. चेतन शांताराम सावकारे (२७, रा. यावल) याला अटक करीत त्याच्याकडून ४८ हजार ५०० रुपयांच्या १७ बनावट नोटा जप्त केल्या होत्या.
त्यानंतर या प्रकरणात नईम बदरुद्दीन शेख याला अटक करण्यात आली. त्या पाठोपाठ आता जिल्हा पेठ पोलिसांनी नरजील नासीर खान याला जामनेर, तर गनी मजीद शेख याला तोंडापूर, ता. जामनेर येथून अटक केली.
अटक केलेल्या नरजील खान याच्याकडून १३ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. तो भंगार विक्रीचे काम करतो, तर गनी शेख हादेखील मिळेल तो काम करणारा आहे.