जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील चिनावल येथील बनावट कागदपत्राच्या आधारे सीमकार्ड व मोबाईल विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करण्यासंदर्भात भारत सरकारच्या टेलीकम्यूनिकेशन विभागाकडून पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरूवार १३ जुलै रोजी रात्री १० वाजता सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील चिनावल गावात राहणारा अल्तमश (पुर्ण नाव माहित नाही) याचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. गेल्या ३ वर्षापासून अल्तमश हा बनावट कागदपत्राच्या आधारे विविध टेलीकॉम कंपन्याचे सिमकार्ड विक्री करत होता. दरम्यान, भारतीय टेलीकॉम विभागाच्या वतीने हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात पत्र पाठवून संबंधित सीमकार्ड विक्रेत्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याच्या सुचना प्राप्त झाल्या. त्यानुसार जळगाव सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोहेकॉ वसंत बेलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरूवारी १३ जुलै रोजी रात्री १० वाजता मोबाईल व सीमकार्ड विक्रेत्यावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बी.डी.जगताप करीत आहे.