जळगाव शहरात कंजरवाड्यात एलसीबीची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील कंजरवाडा भागातील नवल नगर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये देशी-विदेशी बनावट दारु तयार करणाऱ्याच्या स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मध्यरात्री धाड टाकून मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दारु तयार करणाऱ्यालाही ताब्यात घेतले आहे.
जितेंद्र वैद्यनाथ भाट हा कंजरवाडा परिसरातील नवलनगर भागात मागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये देशी-विदेशी बनावट दारु तयार करत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार रविवारी मध्यरात्री १.३० वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापा मारत, जितेंद्र वैद्यनाथ भाट (वय ५५) याला ताब्यात घेतले. याठिकाणी बनावट दारु करताना तो आढळून आला. त्याच्याकडे देशी व विदेशी कंपनीचा बनावट दारुचा साठा आढळून आला. तसेच दारु तयार करण्याचे रसायन देखील आढळून आले.
त्याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला २ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, राजेंद्र उगले, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राजेश मेढे, विजय पाटील, हरिलाल पाटील, प्रमोद ठाकूर, महिला पोलीस कर्मचारी रूपाली खरे यांचा सहभाग होता.