चाळीसगाव तालुक्यातील वरखेड धरणातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड परिसरातील नव्या वरखेड धरणात पोहायला गेलेल्या एका बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. २८ मे रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यश राजेंद्र पवार (वय १४, रा. वरखेड ता. चाळीसगाव) असे मयत बालकाचे नाव आहे. तो गावात आई, वडील, दोन भाऊ, १ बहीण यांच्यासह राहत होता. त्याचे वडील शेतकरी असून शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा मोठा मुलगा यश हा सकाळी ११ वाजता वरखेड गावाजवळ नवीन बनलेल्या धरणावर पोहण्यासाठी मित्रांसोबत गेला होता. दरम्यान, पोहत असताना त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात हलविले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले.
यानंतर यश पवार याच्या परिवाराने मन हेलावणारा आक्रोश केला. मेहुणबारे पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.