अमळनेर न्यायालयाचा निर्णय

जळगाव (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या ४५ वर्षीय इसमावर दाखल गुन्ह्यात अमळनेर न्यायालयाने शुक्रवार दि. ३ मे रोजी निकाल जाहीर केला आहे. सदर इसमास लैंगिक अत्याचार आणि पोक्सो कायद्याप्रमाणे एकूण २० वर्षे शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
चोपडा तालुक्यातील एका गावात शेतकरी कुटुंबात हा घृणास्पद प्रकार सदर संशयित आरोपीने २०२० साली केला होता. १६ वर्षोय पीडितेचे आई-वडील हे शेतात गेल्याचा गैरफायदा घेऊन त्याने वेळोवेळी तरुणीवर एकटे असल्याचे लक्षात घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिला धमकावले. यामुळे सदर तरुणी ही अत्याचारातून गर्भवती झाली. त्यानंतर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला सदर पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बालकल्याण समिती, जळगाव येथे तिचे समुपदेशन करण्यात आले. त्यानुसार अमळनेर न्यायालयात संशयित आरोपी ज्ञानेश्वर रामदास कोळी (वय ४५, रा. चुंचाळे ता. चोपडा) याच्याविरोधात खटला चालला. जिल्हा न्यायाधीश पी. आर. चौधरी यांच्यापुढे सदर खटल्याचे कामकाज चालले. खटल्यात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी आणि पीडित तरुणी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष, तपासणी अधिकारी पोलीस संदीप आराख यांचा तपास महत्त्वाचा ठरला.
सरकारी वकील ॲड. किशोर बागुल यांनी सदर सबळ पुरावे न्यायालयात मांडले. त्यानुसार न्यायालयाने निकाल दिला आहे. यात संशयित आरोपी ज्ञानेश्वर कोळी याला २० वर्षे शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड न्यायालयाने ठोठावला आहे.









