पाचोरा तालुक्यात गोराडखेडाजवळील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) :- शहरानजीकच जळगाव हायवेवर असलेले गोराडखेडा गावाजवळ भीषण अपघात घडला आहे. येथील बसस्थानकावर पाचोरा कडून जळगाव कडे जाणाऱ्या भरधाव लाल रंगाच्या स्विफ्ट चारचाकीने जोरदार धडक दिली. यात १६ वर्षांची शाळेची विद्यार्थिनी आणि ६० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पाचोरा पोलीस घटनास्थळी पोचले असून जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गुरुवारी दि. ४ जानेवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एका गंभीर जखमी दादाभाऊ नामक इसमास जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले तर एका शाळकरी मुलीच्या हातास गंभीर इजा पोहचली आहे. शाळेतून येणारी एक मुलगी दुर्गा पवार (वय १६) व सुभाष पाटील (वय ६०) या दोघांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात जखमींना आणण्यात आलेले आहे, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे, या घटनेने परिसर हादरला आहे. घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत.