भुसावळ शहरातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी):- शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, एका मंगल कार्यालयातून महिलेची पर्स लंपास करण्यात आल्याची घटना घडली आहे. या पर्समध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण २ लाख ४९ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल होता.


फिर्यादी उज्ज्वल प्रबोध भावे (वय ५०, रा. प्रल्हाद नगर, भुसावळ) या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी भुसावळ शहरातील बालाजी हॉल येथे एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. दुपारी ४:०० ते ४:३० वाजेच्या सुमारास त्या हॉलमधील सोफ्यावर बसलेल्या असताना, कोणातरी अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून सोफ्यावर ठेवलेली पर्स चोरून नेली.
याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारती काळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरवस्तीत आणि गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रमात आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.









