पारोळा पोलीस स्टेशनची कारवाई
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील मंगरूळ येथील शंतनु आबाजी चव्हाण यांची ५० हजार रुपये किमतीची बैल जोडी दि. ४ रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. पारोळा पोलीस स्टेशनच्या पथकाने तपासानुसार भडगावकडे रवाना होऊन एका संशयित आरोपीसह दोन तासात बैलजोडी हस्तगत केली आहे.
याबाबत दि. ४ ऑगस्ट रोजी पहाटे १ ते ८ वाजेचे दरम्यान मंगरुळ शिवारातील जागेतील शेतातून पांढऱ्या रंगाची बैलजोडी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती. पारोळा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्या आदेशान्वये उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, पोलीस हवालदार डॉ. शरद पाटील, कैलास साळुंखे, बापू पारधी, मिथुन पाटील असे पथक भडगावकडे रवाना करण्यात आले होते. त्यावेळी संशयित सुनील आस्तिक भिल हा दि. ५ रोजी भडगाव रस्त्यावर चोरवड शिवारात सदर बैल जोडी पायी भडगावकडे नेत असताना मिळून आला.
त्यासोबतचा एक संशयित अद्याप फरार असून त्याच्या तपास सुरू आहे. बैल जोडी ही गोशाळेत पाठवण्यात आली असून न्यायालयातर्फे मालकास ती जोडी परत देण्यात येणार आहे. आज दि. ६ रोजी सुनील भिल यास पारोळा न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल कैलास साळुंखे हे करीत आहेत.