अमळनेर तालुक्यातील सात्री येथे प्रशासनाची तारांबळ
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सात्री गावाला पूल नसल्याने आणि बोरी नदीला पाणी आले असल्याने निवडणूक कर्मचारी यांच्यासह ईव्हीएम मशीन, साहित्य बैलगाडीवर नेण्याची वेळ प्रशासनावर आली.
निवडणूकीचे साहित्य आणि कर्मचारी घेऊन बस निघाली. डांगरी गावाला आल्यावर कर्मचारी आणि साहित्य बस खाली उतरवण्यात आले. बोरी नदीला पाणी आलेले असल्याने नदीतून एस टी जाणे शक्य नव्हते आणि साहित्य घेऊन कर्मचार्यांना पायी जाणेही शक्य नव्हते. सुनील बोरसे यांची बैलगाडी मागवण्यात आली.(केसीएन)सर्व साहित्य आणि कर्मचाऱ्यांना बैलगाडीत बसवण्यात आले. अर्ध्या पाण्यात बैलगाडी आल्यावर वाळूत बैलगाडी फसली. बैलगाडी अडकली म्हणून पोलीस पाटील विनोद बोरसे , सरपंच महेंद्र बोरसे मदतीला धावले. बैलगाडी लोटली आणि पाण्याबाहेर काढली. तेथून कर्मचाऱ्यांना खाली उतरवून वाळूतून पायी केंद्रापर्यंत नेण्यात आले.
केंद्राचे प्रमुख तुषार पाटील यांनी सांगितले की, गुडघाभर पाण्यात बैलगाडी अडकली. बैलांकडून गाडी ओढली जात नव्हती तेव्हा भीती वाटली. एखाद्या आदिवासी पाड्यावर आलो की काय असे वाटत होते. पोलीस पाटील विनोद बोरसे यांची मदत झाली, असेही ते म्हणाले. विधानसभा अमळनेर मतदार संघाचे मतदान केंद्र क्रमांक ७ तालुक्यातील सात्री येथे आहे.(केसीएन)या गावाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून पूल नाही. गाव निम्न तापी प्रकल्प पाडळसरे मध्ये बुडीत क्षेत्रात येत असल्याने गावाला पूल होत नाही आणि नवीन पुनर्वसित गावचे भूखंड वाटप होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यात समस्यांना सामोरे जावे लागते. प्रशासनालाही त्याचा चांगलाच अनुभव आला.